Saturday 15 August 2020

Goa's Oldest Online News Portal

रणांगणातील माड

 


मी माड,

आयुष्यात प्रथमच,

शोधतोय मी,

धर्म  माझा

अन् धडपडतोय

जाणून घेण्यास,

जात  माझी.

 

मी मरण्यापूर्वीच,

बडवला जात आहे,

राजकारण्यांकडून ऊर स्वतःचा

जे कधीच  रडले  नाहीत आयुष्यात

ते अश्रू गाळताना

दिसत आहेत मला

 

मी  मारला  जाणार असल्याची

गावभर  पसरलीय  अफवा

जंगलातील  आगीसारखी

 

काहीजणांनी मुद्दाम

काहींनी अज्ञानापोटी

काहींनी  राजकारणापोटी

तर अवघ्यांनीच निव्वळ  प्रेमापोटी

सांभाळून राहण्यास,

सांगितलय मला

 

या गोंधळात

धास्तावलेला मी

प्रथमच  शोधतोय

एक सुरक्षित  धर्म

अन्  तेवढीच सुरक्षित गल्ली

 

मी  अल्पसंख्यांक

की  बहुसंख्यांकांमध्ये येतो

राष्ट्रवादी  की  देशद्रोही मी

खूप  अस्वस्थ  प्रश्न  पडतात

अलिकडे  मला...

 

कालपर्यंत  केवळ

हिंदू--मुस्लिम एवढाच

विषय  असायचा

निवडणूक  आखाड्यात

आता मी माड आलोय

सर्वांच्याच अजेंड्यावर

 

जीव वाचवण्यासाठी

मी शोधतोय

सुरक्षित धर्माचे कोंदण

 

पूर्वी होतो ब्राह्मण मी

सरकारने ठरवलंय आता

दलित मला

अशी फसवी हुल

उठवलीय विरोधकांनी

 

तरीही संशयाचे

अन् भीतीचे गवत

उगवतेय माझ्या तनामनांत

 

मी ठरवलंय,

उद्यापासून डोक्यावर टिळा

अन्  हातात  झेंडा घेऊनच

यायचं  समाजासमोर

 

मुडदा  पडू नये म्हणून,

चुडतांचा उतरवून  बुरखा

मला  नवा  चेहरा  चढवायचाय

कृषी  संस्कृती  लपवणारा

अन्  धर्म संस्कृती  दाखवणारा...
Khay re tu patrao?

 
PS to PS speaker |

Good one. Vastavwadi.

 
Abdul |

सुन्दर!वर्तमान स्थिति चे यथार्थ वर्णन करणारे काव्य।

 
Subhash salgaonkar ps to speaker |

Blogger's Profile

 

सदगुरू पाटील

सद्गुरू पाटील हे पेशाने पत्रकार असले तरी मनाने कवी आहेत. फेब्रुवारी 1976 मध्ये मये गावात जन्मल्यानंतर त्यांचे बालपण व शालेय शिक्षण डिचोली व सत्तरीसारख्या ग्रामीण तालुक्यांत झाले. 1996 पासून ते पत्रकारितेत आहेत. सध्या दैनिक लोकमतच्या गोवा आवृत्तीचे ब्युरो चीफ म्हणून काम पहातात. शिवाय गोवा युनियन ऑफ जर्नलिस्टचेही ते अध्यक्ष आहेत. आतापर्यंत ‘व्यक्त होताना’ व ‘टचस्क्रीन’ हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या ‘टचस्क्रीन’ला यशवंत पुरस्कार प्राप्त झालेला आहे. सध्या 60 कवितांचा तिसरा काव्यसंग्रह प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे.

 

Previous Post

 

Archives