Saturday 08 August 2020

Goa's Oldest Online News Portal

CLEAR CUT

पोटनिवडणुकांतील विजय भाजपाला नवसंजीवनी देईल काय?

 

या वर्षीच फेब्रुवारीत झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसही जिंकली नाही वा भाजपाही. प्रत्यक्षात जिंकली ती चर्च व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.


पोटनिवडणूका या तशा फारशा महत्वाच्या नसतात. परंतु पणजी आणि वाळपईच्या होत्या. कारण या सरकारचे भवितव्य या पोटनिवडणुकांवर अवलंबून होते. तेही दोन गोष्टींसाठी. एक म्हणजे यातील एक निवडणूक खुद्द मुख्यमंत्र्यांची होती. आणि दुसरी अवघ्या एका दिवसात आमदारकीचा राजिनामा देऊन काँग्रेसमधून भाजपात आलेल्या व मंत्री बनलेल्या आमदाराची होती. न निवडलेला मुख्यमंत्री आणि बाजू पलटलेला मंत्री यांना मतदार काय निवाडा देतो त्याचे कुतुहल राजकीय वर्तुळातसुद्धा खात्रीने होते.

1963 साली झालेल्या गोव्यातील पहिल्याच विधानसभा निवडणुकीतही भाऊसाहेब बांदोडकर निवडून येऊन मुख्यमंत्री झालेले नव्हते. ते आधी मुख्यमंत्री झाले व नंतर सहा महिन्यांच्या आत मडकई मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर आधी मुख्यमंत्री होऊन नंतर निवडून येणारे मनोहर पर्रीकर हे दुसरे मुख्यमंत्री. तब्बल 54 वर्षांनंतर. त्यातही ही निवडणूक झालेली भाजपाची पडझड सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर. 21 चा क्रमांक 13 वर आल्यावर. तरीही आपल्याच विरोधकांना हाताशी धरून सरकार स्थापन केल्यावर त्यावर लोकांच्या उलट-सुलट प्रतिक्रिया यायला लागल्या होत्या. तेव्हा प्रत्यक्ष पोटनिवडणुकीत मतदार कशी काय प्रतिक्रिया देतो याची उत्सुकता होतीच.

भाजपाचे दोघेही अनुभवी व प्रबळ उमेदवार तर काँग्रेसचे दोघेही बाहेरगावाहून आयात केलेले उमेदवार अशी ही लढत होती. वाळपईत रॉय रवी नाईक व पणजीत गिरीश चोडणकर बहुतेक पहिल्यांदाच आपापल्या मतदारसंघांतून घरोघर फिरले. पर्रीकर व राणेंना ही घरे रोजचीच होती. 1994 पासून गेली 23 वर्षे पर्रीकर पणजीत आमदार म्हणून कार्यरत आहेत. विश्वजीत राणे 2007 पासून गेली दहा वर्षे आहेत. शिवाय एक मुख्यमंत्री तर दुसरा मंत्री. रॉयला निदान 1980 पासून राजकारणात असलेल्या वडिलांची साथ होती. शिवाय त्यांचे स्वतःचे असे कार्यकर्त्यांचे एक जाळे होते. चोडणकरांना तेही नव्हते. ना वाडवडिलांची राजकीय ‘ पुण्याई’ ना काँग्रेसचे केडर.

तरीही विश्र्वजीत व पर्रीकरांना या पोटनिवडणुकीत अथक परिश्रम करावे लागले हे निःसंशय. योगायोगाने हे दोघेही राजकारणी राजकीय आखाडे बांधण्यात हुषार. एक आयआयटी प्रशिक्षित तर दुसरा एमबीए. सत्ता डोक्यात भिनवून बिनधास्त रहाणाऱ्यांपैकी तर खचितच नव्हे. आपला पाया हलतो आहे याचा थोडासा जरी अंदाज आला तरी खुषमस्कऱ्यांच्या कोंडाळ्याला बाजूला काढून प्राप्त परिस्थितीची कोंडी फोडण्यासाठी साम-दाम-दंड-भेद निर्दयपणे वापरणारे मुरब्बी राजकारणी. व्यवस्थापन शास्त्रात स्वॉट एनालिसीसीस नावाचा महत्वपूर्ण प्रकार असतो. स्वॉट म्हणजे स्ट्रेन्थ (सामर्थ्य), वीकनेस (दुर्बलता), अपॉर्ट्युनिटी (संधी) आणि थ्रेट्स (धोके) यांचे विश्लेषण करून डावपेच आखणे. यात दोघेही माहिर. त्यामुळेच या पोटनिवडणुका जिंकणे त्यांना शक्य झाले.

विश्वजीत राणेंची ही चौथी निवडणूक. 2007 मधली पहिली निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली होती. तेव्हा काँग्रेसचा उमेदवारच गायब झाला होता. त्यावेळी त्यांनी 36 टक्के मते मिळवली होती. 2012 ची निवडणूक ही पूर्णतया काँग्रेसविरोधी होती. खुद्द विश्वजीतचे वडील प्रतापसिंग राणेंना घरोघरी फिरून आपली ही शेवटची निवडणूक असे सांगून मते मिळवावावी लागली होती. पण विश्वजीतनी मात्र ही निवडणूक तीन हजार मतांची आघाडी मिळवून जिंकली. त्यावेळी त्यांचा मतांचा वाटा होता 41 टक्के. मात्र मागच्या विधानसभा निवडणूकीवेळी सत्तेत असलेली भाजपा बदनाम झाली आणि 17 जागा मिळवून काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष झाला त्यावेळी मात्र विश्वजीतचा मतांचा वाटा 10 टक्कयांनी घसरला. मताधिक्य 5600 वर जाऊनसुद्धा.

या परिस्थितीत एका दिवसात आमदारकीचा राजिनामा देऊन भाजपात प्रवेश मिळवून मंत्री बनलेल्या विश्वजीतनी आपली स्वॉट एनालिसीस केलेली आहे ते त्यांच्या कार्यपद्धतीवरून स्पष्ट होत होते. त्यात भर म्हणून उसगाव-गांजे भागात प्रबळ असलेल्या रवी नाईकनी आपल्या पुत्राच्या गुडघ्याला बाशिंग बांधले व ते स्वतः रात्रंदिवस वावरले. त्यामुळे विश्वजीतनाही कंबर कसावी लागली. आणि त्याचाच परिणाम म्हणून मागच्या निवडणुकीपेक्षा दुप्पट म्हणजे 10 हजारांचे मताधिक्य आणि 70 टक्के मतांचा वाटा मिळविण्यात ते यशस्वी झाले. कदाचित गोव्याच्या निवडणूक इतिहासातील हा विक्रमही असू शकेल. अर्थात, बिनविरोध निवडून आलेले आमदार सोडून. आणि निवडून आल्यावर आपणाविरुद्ध काम केलेल्या काही खाणमालकांचे व प्रसार माध्यमांचे वाभाडे काढण्यातही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.

 

याहूनही खरी चुरशीची झाली ती पणजीची पोटनिवडणूक. पर्रीकर मुख्यमंत्री, तेव्हा ते सहजगत्या जिंकतील अशी जी अटकळ होती तशी प्रत्यक्षात परिस्थिती नव्हती. एका बाजूने घरचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाले भेदी झालेलेच होते. त्यांचा गोवा सुरक्षा मंच हे केवळ पर्रीकरांविरुद्ध गरळ ओकण्यासाठी तयार केलेले व्यासपीठ आहे हे पर्रीकरांसहित भाजपाच्या सर्वच नेत्यांना माहित होते. तेव्हा मागच्या विधानसभा निवडणुकीत सिद्धार्थ कुंकळ्येकरांविरुद्ध लढत दिलेले डॉ केतन भाटीकर भाजपा समर्थकांच्या कँपमध्ये गेले म्हणून गोसुमंला काहीही फरक पडत नव्हता. संघवाल्या कट्टर केडरने गोसुमंला बाजूला ठेऊन विनेबल उमेदवाराकडे मते वळविल्यानेच भाजपा आमदारांची संख्या 13 वर पोचली आहे हे त्यांना पुरेपूर ठाऊक होते.

या वर्षीच फेब्रुवारीत झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसही जिंकली नाही वा भाजपाही. प्रत्यक्षात जिंकली ती चर्च व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. चर्चने भाजपाच्या प्रत्येक अल्पसंख्य उमेदवाराला पाठिंबा देऊन आमदार केले व इतर ठिकाणी आपली शक्ती काँग्रेसच्या पाठीशी उभी केली. त्यामुळेच आज भाजपात अल्पसंख्य समाजाचे सात आमदार आहेत आणि त्यामुळे चर्चला डावलून भाजपावाल्या पर्रीकरांचे सरकार चालूच शकत नाही. दुसऱ्या बाजूने संघवाल्यांनी भाजपाचे बहुतेक प्रबळ उमेदवार पाडले आणि त्यामुळे पर्रीकर व प्रमोद सावंत हे दोघे सोडल्यास केडरमधले भाजपा आमदारच नाहीत अशी परिस्थिती भाजपाची झालेली आहे. मात्र मागच्या निवडणुकीत पणजीत कुंकळ्येकरांना व आता पर्रीकरांना पाडणे त्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांच्या डावपेचांचा फायदा कुणाला यावर आत्मचिंतन करण्याची वेळ आता संघवाल्यांवर आलेली आहे.

अशा परिस्थितीत गाफिल राहिले असते तर ते पर्रीकर कसले? त्यामुळेच तर पणजीतून निवडणूक लढवणार अशा आरोळ्या ठोकीत बसलेले बाबूश मोंसेरात अचानक गोवा फॉरवर्डमध्ये सामील झाले व पर्रीकरांच्या विरोधातल्या पहिल्या उमेदवाऱ्याने नांग्या टाकल्या. ऍड सुरेंद्र देसाई व नंतर माजी महापौर अशोक नाईक हे दोघेही काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढण्यासाठी राजी झाले होते. परंतु कुठे माशी शिंकली ते कोणालाच कळले  नाही, परंतु त्यांनीही माघार घेतली. त्यांना धमक्या दिल्या असा आरोप संघवाल्यांकडून झाला. खरेखोटे तेच जाणे. परंतु माघार न घेणारा उमेदवार पाहिजे  म्हणून मडगावहून गिरीश चोडणकरांना आयात करण्याची पाळी काँग्रेसवर आली. चोडणकर हा बळीचा बकरा आहे अशी त्यांची सुरवातील संभावना झाली खरी, परंतु अचानक वारे उलटे फिरू लागले व पर्रीकरांच्या विरोधातील लाटांवर चोडणकर तरंगू लागले. अवघ्या 15 दिवसांत पाच हजार मते मिळविणे व 33 टक्के मतांचा वांटा मिळविणे खुद्द पणजीचे महापौर, उपमहापौर व राजकीय क्षेत्रात वावरणारे सुरेंद्र फुर्तादो, यतीन पारेख वा केशव प्रभूंना शक्य झाले नव्हते. हे यश चोडणकरांचे आहे की पर्रीकरविरोधात तयार झालेल्या वातावरणाचे आहे हाच आता खरा संशोधनाचा विषय आहे. कारण त्यावरच पुढील निवडणुकीत पणजीचा आमदार ठरणार आहे.

1994 मध्ये म्हापशेचा भायला उमेदवार ही संभावना सहन करीत निवडून आलेल्या पर्रीकरांचा ग्राफ 2012 पर्यंत चढतच गेला. 44 टक्क्यांवरून मतांचा वाटा 66 टक्क्यांवर पोचला. मात्र त्यानंतर 2015 मध्ये पर्रीकर संरक्षण मंत्री म्हणून गेल्यावर झालेल्या पोटनिवडणुकीत पर्रीकरांच्या खास मर्जीतील कुंकळ्येकरांचा मतांचा वाटा 65 टक्क्यांवर घसरला आणि यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तर तो चक्क 46 टक्क्यांवर घसरला. तिथून पर्रीकरांनी 64 टक्क्यांपर्यंत बाजी मारली खरी, परंतु ती पूर्वीच्या दोन निवडणुकांपेक्षा कमी आहे हेही तितकेच खरे. पर्रीकर आठ हजारांहून जास्त मताधिक्य मिळवून जिंकतील या फुशारक्याही हवेतच विरून गेल्या. प्रत्यक्षात त्यांना मताधिक्य मिळाले ते केवळ 4800 मतांचे. शेवटी निवडणूक जिंकणे हे महत्वाचे असते हे जरी खरे असले तरी मतांची गोळाबेरीज करून त्याचे विश्लेषण करणे आगामी आखाडे बांधण्यासाठी तेवढेच महत्वाचे असते. त्यादृष्टीने बघता भाजपाच्या या अनबिटेबल पुढाऱ्यावरही या पोटनिवडणुकीने आत्मचिंतन करण्याची वेळ आणलेली आहे हे निश्चित.

मात्र या पोटनिवडणुकांतून सरकारवरील अस्थिरतेचे सावट दूर झालेले आहे. कालपर्यंत विजय सरदेसाईंच्या इशाऱ्यावर पर्रीकर नाचत आहेत अशी टीका मुख्यमंत्र्यांना सहन करावी लागत होती. पर्रीकरांचा पूर्वीचा जोश त्यांच्या कार्यपद्धतीत दिसत नव्हता. पर्रीकर अगतिक बनत चालले आहेत की काय असे वाटत होते. मात्र आता ते निर्वाचित आमदार झालेले आहेत. तेव्हा मुख्यमंत्र्याचा पूर्वीचा जोश पुनश्च येईल की काय ते आता पहावे लागेल. आणि त्यावरच त्यांच्या या युती सरकाराचे यशापयश अबलंबून राहील. दुसऱ्या बाजूने सर्वाधिक जागा मिळवून उपाशी राहिलेली काँग्रेस विरोधकाची भुमिका कशी पार पाडतो यावरही ते अवलंबून असेल. त्याशिवाय 2019 मध्ये होणारी लोकसभा निवडणूक तर आहेच. तिथे परत भाजपा सत्तेवर आली तर मग भाजपाचा गोव्यातला रथ अडविणे विरोधकांना बरेच कठीण जाणार आहे.  या पोटनिवडणुकांचा हाच खरा अन्वयार्थ आहे.

(हा लेख 29 ऑगस्ट 2017 च्या दै. नवप्रभा मध्ये प्रसिद्ध झालेला आहे)
Blogger's Profile

 

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of HCN and Prudent, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities.

 

Previous Post

 

Archives