Thursday 18 July 2019

Goa's Oldest Online News Portal

गांधीबाबा थोर आहे

 

जोशात साजरी केली जाईल निष्क्रियांची गांधी जयंती घाणेरड्यांचा स्वच्छता दिन2 ऑक्टोबर 2014

जो येणार नाही यंदा

1 ऑक्टोबरच्या दुसर्‍या दिवशी

रोजच्यासारखाच, परंतु 

असेल आगळा... वेगळा...

 

गोव्याच्या इतिहासातला

हा असेल सुवर्णदिन

घासून-पुसून स्वच्छ केलेला

चकाकीने डोळे दिपवणारा

आपण चुकीच्या जागी

तर आलो नाही ना असा

सामान्यांना गोंधळवणारा

 

कारण

गांधीबाबाच्या बर्थडेला होणार सफाई

तीही चक्क सरकारी कार्यालयांनी

नव्हे रोजचीच ’हाथ की सफाई’

चक्क हातात केरसुणी व फडका घेऊन

स्वतःच्या हाताने केलेली

स्वच्छता ! खरी सफाई !!

 

आठवड्यातले चार दिवस जिथे

दिसत नाही कुणीच बसलेला

आलाच कामावर तर टिकत नाही

तीन-चार तासांहून जास्त वेळा

साफ होणार तिथलीही धूळ

 

अस्ताव्यस्त टाकलेल्या फायलीही

केल्या जातील एकत्र, कदाचित

कुणाची गेली कित्येक वर्षे हरवलेली

फायलही सापडेल न शोधताच

परत हरवून टाकण्यासाठी

 

 

रोजच्या कमाईचे ड्रॉवरही

केले जातील ‘साफ’

राहिलेली चिल्लरही गुल करून

नव्या लक्ष्मीच्या स्वागतासाठी होईल

तो अनऑफिशियल काउंटर सज्ज

नव्या उत्साहाने

गांधीबाबाच्या स्मरणाने

 

प्रत्येकाने आपापले टेबल

साफ करतानाच करायच्यात

इतरही जागा स्वच्छ, परंतु

ते काम दुसरा करेल म्हणून

प्रत्येकला चोरील अंग

रोजच्याप्रमाणेच

प्रोस्यूजरप्रमाणे

 

काम नसणार नाही ते फक्त त्यांनाच

जे रोजच येवून काम करतात

इमानेइतबारे,

प्रशासन चालतेय ते त्यांच्याचमुळे

कसल्याही वशिल्याविना

‘दाम करी काम’ गुणगुणल्याविना

 

कदाचित ते येणारही नाहीत त्या दिवशी

रोजच स्वच्छता राखणार्‍याला

काम तरी काय असेल त्या दिवशी?

मग त्यांना दिली जाईल गैरहजेरीची फुली

आणि जोशात साजरी केली जाईल

निष्क्रियांची गांधी जयंती

घाणेरड्यांचा स्वच्छता दिन

 

करा करा स्वच्छ करा

जाता जाता जमलं तर एक काम करा

असलाच कार्यालयात फोटो गांधीचा

तर त्यावरचीही जळमटे झटकून टाका

बघू दे त्यालाही बिचार्‍याला

अस्वच्छांनी केलेली

त्याचीच सफाई, त्याच्याच नावाने

 

आता करणारच असाल तर आणखीन

एक गोष्ट का नाही करीत ?

शोधून काढा जळमटे

मनातलीही

यूडीसींच्या, सेक्शन हेडांच्या

अंडर सेक्रेटरींच्या, सेक्रेटरींच्या

आणि आमदार-मंत्र्यांच्याही

 

झटकून टाका जळमटे

बेपर्वा वृत्तीने घेरलेली

लाचारीने लाळ घोटणारी

जातीयवादात लोंबकळणारी

धर्मांधतेने धुंद झालेली

सत्तेची मस्ती ल्यालेली

मस्तवाल... बेताल...

 

काय म्हणता, नाही जमणार ?

अच्छा अच्छा

तसा उल्लेख नाही सर्क्युलरमध्ये

नाही तरी सर्क्युलर हे वाटोळंच असतं

त्याचंही एक भलं मोठं शून्यच बनतं

त्याला छेद द्यायची बिशाद कोणाची ?

 

बरं नसेल करायचं, तरी

एक काम मात्र नक्की करा

त्या तिथे कोपर्‍यात

एक बोर्ड पडलाय

धूळ खात

गेली कित्येक वर्षे

’जनतेची सेवा हाच माझा ठेवा’

साफसफाईच्या कचर्‍यासोबत

हळूच

तोही फेकून द्यायला विसरू नका

हवी कशाला नसती घाण?

असला सगळा कचरा गेला

की किती स्वच्छ-निर्मळ वाटेल कार्यालय

किती उत्साह येईल कामाला नव्याने

 

गांधीबाबा, खरंच

तुझी पुण्याई थोर आहे

तू जन्मालाच आला नसतास

विचारच करवत नाही

तर काय झालं असतं

एका दिवसाच्या स्वच्छतेचंसुद्धा

खोबरं की हो झालं असतं

 

आयशप्पत, गांधी ही देशाला

फार मोठी देणगी आहे

स्वच्छतेच्या एका दिवसाची

मजा काही औरच आहे

मजा ’मनोहर’ आहे....
Blogger's Profile

 

Sandesh Prabhudesai (EdiThought)

Sandesh Prabhudesai is the Editor of goanews.com. He has been earlier the Editor of Sunaparant (Konkani daily) and Editor-in-Chief of Pruden (TV channel). His collection of selective editorials of Sunaparant has been published as 'Goff'. He writes brief thoughts as EdiThought for goanews.com, but not on regular basis.

 

Previous Post

 

Archives